माझे घर मराठी निबंध | My house essay in marathi | My Home Essay in marathi | Maze Ghar Marathi Essay | Marathi essay on my home in Marathi या विषयावर तुम्ही पुढील निबंध वापरू शकता.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत माझे घर मराठी निबंध
माझे घर मराठी निबंध
“घरासारखे घर असावे, नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती’
घर म्हणजे आपुलकी, घर म्हणजे जिव्हाळा, घर म्हणजे विश्वासाचे विश्रांतीस्थान. दिवसभर केलेले श्रम, दगदग यासाठी श्रमपरिहाराची, माणूसकीच्या अतूट बंधनाने बांधलेली नि नात्याच्या धाग्यात गुंफलेली जागा म्हणजे घर. आपल्यावर प्रेमाचा अखंड वर्षाव करणारे घर. पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पिलांना घरट्यातून आभाळात उडण्याचे ज्ञान देतो त्याप्रमाणे आईवडील आपल्या मुलांना समाजात सुखाने जगण्यासाठी आणि तगण्यासाठी जिथे घडवितात ती जागा म्हणजे घर होय.
आईच्या हास्यावर, ताईच्या लोभावर, वडीलांच्या कर्तृत्वावर, भावाच्या भावनेवर, जे धडधाकट उभे राहते ते घर! माणूस जन्म घेतो, बाललीलांनी फूलवितो ते घर होय.
घर म्हणजे जिथे जिव्हाळा, संस्कार आणि व्यवहारज्ञानाचे धडे गिरविले जातात. भावाबहिणींनी एकत्र कुटुंबात एकोप्याने राहण्याचे वसतिस्थान. बाहेरील खाचखळगे ओलांडण्यासाठी ज्ञान मिळते ते याच घरातून. घर मोठे, छोटे, बंगला, वाडा किंवा फ्लॅट कोणत्याही प्रकारचे असो, प्रत्येकाला आपले घर प्रिय असते. घर हक्काचे निवाऱ्याचे ठिकाण असते.
मला माझे चार खोल्या असलेले टूमदार घर खूप आवडते. त्यातील साधीशी सजावट करुन नीटनेटकी लावलेली खोली तर फारच आवडते. प्रत्येकजण आपापली खोली व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे घर अजूनच छान दिसते. माझ्या घरात माझे आजी-आजोबा, आईबाबा, दीदी, मी आणि छोटा भाऊ असे सर्वजण राहतो. आम्ही सर्वजण एकमेकांशी खूप प्रेमाने आणि खेळीमेळीने वागतो. माझी आजी तर स्वयंपाकात सुगरण असल्याने आमच्या जेवणात दररोज निरनिराळ्या सुग्रास पदार्थांची चंगळ असते.
आजोबा आम्हाला ऐतिहासिक, पौराणिक कथा सांगून आमच्या ज्ञानाचा ठेवा नेहमीच वाढवत असतात. बाबांचा गणित विषय आणि आईचा इंग्रजी विषय आवडता असल्याने ती दोघेही आमचा अभ्यास घ्यायला तत्पर असतात. कधी काही कारणाने आमच्यात मतभेद असतील तर आम्ही समोरासमोर बसून सामंजस्याने आमच्यातील गैरसमज दूर करतो. त्यामुळे वातावरणात ताण न राहता लगेच खेळीमेळीचे होते.
आमच्या घरात होणारे सर्व कार्यक्रम आम्ही थोरामोठ्यांच्या सल्ल्याने आणि आशीर्वादाने पार पाडतो. कारण त्यांचा अनुभव मोठा असल्याने त्याचा आम्हाला फायदाच होतो. आमच्या घरातील सर्वजण एकमेकांना त्यांच्या कामात खूप मदत करतात. त्यामुळे कामाचा बोजा किंवा जबाबदारी वाटत नाही. तसेच दुसऱ्यांना नेहमी मदत करण्याची सवय अंगी बाणली जाते.
माझ्या घराचा बैठकीच्या खोलीचा भाग खूप प्रशस्त आहे. त्यामुळे त्यातीलच एका मोठ्या कोपऱ्यात डायनिंग टेबलाची व्यवस्था आहे. आमच्या घरातील बरेच जण सकाळी शाळा, कॉलेज, कार्यालयाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळी बाहेर पडतात. .त्यामुळे संध्याकाळी सर्वांनी एकत्र बसून जेवायचे हा आमच्या घराचा दंडक आहे. त्यामुळे दिवसभराच्या घडामोडीची, कामाची चर्चा होते. दिलखुलासपणे आग्रह करुन जेवल्याने वातावरणही हलकेफुलके असते.
माझे घर सर्वांना आदर्श वाटावे असेच आहे. घरातील मोठ्या लोकांचा आदर करण्याची वृत्ती असल्यामुळे मुलांपुढे तोच आदर्श राहतो आणि मुलांवरील संस्कार फुलविले जातात. घर म्हणजे नुसते दगड, माती, चुनामिश्रित बांधकाम नसून त्यात राहणाऱ्या लोकांना इतरांविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा आणि आपुलकीचा इमला असतो.
तुम्हाला हा माझे घर मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
हे नक्की वाचा :
1 thought on “{Essay} माझे घर मराठी निबंध । My Home Essay in marathi”