[Essay] मी वाट बोलतेय मराठी निबंध । Mi vaat boltoy marathi essay

मी वाट बोलतेय मराठी निबंध – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो.

तर आज आपण मी वाट बोलतेय मराठी निबंध या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत.
 

मी वाट बोलतेय मराठी निबंध

मी वाट बोलतेय मराठी निबंध

 

वाट धावते धावते, चढ उतार घेऊन; दुःख गिळते हसत, आत हुंदका पिऊन!

“बाळा आज पहिल्यांदाच शहरातून खेड्यात आलास ! तुला अनेक गोष्टी इथे प्रथमच पहायला मिळतील. तुला माझी ही ओबडधोबड आणि जीर्ण अवस्था पहावत नाही का ? मी अशीच काट्याकुट्याच्या, डोंगरवळणाच्या मार्गातून तयार झालेली पाऊलवाट आहे. मी खेड्यातील शेतकऱ्यांच्या, कामकर्यांच्या पाऊलखुणांमधून, आपोआप बनलेली अशी ही वाट आहे.”

पाऊलवाट आपले मनोगत व्यक्त करत होती. मधूनच हूंदकेही देत होती. कधी कधी समाधानाचे सुस्कारेही सोडत होती. ती पुढे सांगू लागली, मी तुमच्या शहरातील डांबरी रस्त्यासारखी खडी आणि डांबर ओतून बनवलेली नाही. ना मला बनवण्यासाठी कुणी वेगळे प्रयत्न केले. तुमच्या डांबरी रस्त्यावर एकावेळी तीन-चार वाहने सहज जावू-येवू शकतात पण माझ्यावर मात्र फक्त शेतकरीदादाची बैलगाडी आणि कामगाराची सायकलच ये-जा करु शकते. मला त्या गोष्टीचे वाईट वाटत नाही. मला याच वाहनांची सवय आहे.

तुमच्या शहरातल्या रस्त्यांना नवीन करण्यासाठी पुन्हा-पुन्हा रोलर मशीन फिरवावे लागते. लाखो रुपये खर्च करावे लागतात. माझे तसे नाही. शेतकऱ्याला शेतातून घरी पोहोचायला उशीर लागू नये म्हणून माझ्यावरुन चालून चालून शेतकरी, मुले आणि स्त्रियांच्या पावलांनी मी बनुन गेले आहे. डांबरी रस्त्याकडे नसलेली सहनशीलता माझ्याकडे आहे.

कधीकधी वाऱ्याच्या झोतामुळे चुकार बाभळीचे काटे माझ्यावर येवुन पडतात. एखाद्याच्या पायात तो काटा घुसून त्यातून रक्तही येते. खूप वाईट वाटते. पण माझा नाइलाज असतो. माझा मार्गच दोन शेतांमधून आहे. माझ्या आजूबाजूला बोरी, बाभळीची झाडे उगवतात. त्यातीलच एखादा काटा खाली पडतो. मी तुम्हाला फक्त शेतातूनच नव्हे तर ओढ्यामधून, ओढ्याच्या काठानेही घेऊन जाते.

ओढ्याच्या खळखळ प्रवाहातून जाताना तुमच्या पायाला गुदगुल्याही होतात. उन्हातान्हाच्या वेळी थंडावाही मिळतो. कितीतरी मुके जीव, गरीब लोक माझ्या सहवासात येतात. त्यांची सोय बघणे, त्यांना न चुकवता घरापर्यंत सुखरुप पोहोचवणे हाच माझा हेतू असतो. त्यातच मला माझ्या जन्माचे सार्थक वाटते.

रानावनातून जाताना, सळसळणाऱ्या पानांच्या सावलीतून वेडी वाकडी वळणे घेत जाताना मला मजा वाटते. मध्येच वारा देखील येऊन माझ्या कानात गुणगुणतो आणि विचारतो. निळेनिळे डोंगर चढून येतेस का माझ्याबरोबर, पण वारा दमून मागेच रहातो. मी देखील रस्त्यावरील ओढ्यात गुप्त होते. माझा मार्गच खडतर, काट्याकुट्यांचा, दगडधोंड्यांचा आहे. माझ्यावरुन जाणारा वाटसरु कधीतरी ठेचकाळतो, रक्तबंबाळ होतो. पण उठून पुन्हा चालायला लागतो. कारण त्याला माहित असते की हा मार्ग यशाचा आहे. उद्याही आपल्याला याच मार्गावरुन यायचे आहे.

ही वाट दूर जाते स्वप्नातल्या गावा… ही कवी कल्पना सत्यात उतरवताना, त्यात धडपडणारा, ठेचकाळणारा पुढे यशाचे शिखर गाठत असतो मग ती वाट कितीही बिकट असो.

तुम्हाला हा ‘मी वाट बोलतेय मराठी निबंध ‘ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

हे पण वाचा :

पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध

शेतकर्याचे मनोगत मराठी निबंध

Leave a comment