[Essay] रम्य सायंकाळ मराठी निबंध । Ek Ramya Sayankal Marathi essay

रम्य सायंकाळ मराठी निबंध । Ek Ramya Sayankal marathi essay । एक रम्य संध्याकाळ । सायंकाळ कविता । मला आवडलेली सायंकाळ मराठी निबंध । या विषयावर तुम्ही हा निबंध वापरू शकता.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नियमित नवीन निबंध घेऊन येत असतो. तर आज आपण बघणार आहोत रम्य सायंकाळ मराठी निबंध

मला आवडलेली रम्य सायंकाळ मराठी निबंध

मला आवडलेली रम्य सायंकाळ मराठी निबंध

ऊन पसरे कोवळे सोनियाचे

कळस पिवळे शोभती देवळांचे।।१।।

सांज झाली सुटे मंद वात

घरांमधुनी लागेल सांजवात ।।२।।

सूर्य ढळला होता. टेकडीच्या मागे लपता लपता आपली सोनेरी किरणे सर्व आसमानभर फैलावत होता. मी मुंबईहून पुण्याला जात होतो. गाडी वेगाने धावत होती. कसे कोण जाणे गाडीचे मागील चाक अचानक पंक्चर झाले. आता चाक बदलणे अत्यावश्यक होते. बसचा ड्रायव्हर पाना, स्क्रुड्रायव्हर घेऊन खाली उतरला आणि चाक बदलण्याच्या कामाला लागला. आम्हीही पाय मोकळे करण्यासाठी गाडीतून खाली उतरलो. बाहेर सूर्य अस्ताला जातानाचे विहंगम दृष्य दिसत होते. उंच ठिकाण असल्याने थंडगार हवा सुटली होती. नुकताच पाऊस पडून गेल्याने मृद्गंध सुखद वाटत होता. आजुबाजूला दाट झाडी आणि सुंदर पर्वतराजी मनोहरी दिसत होती. जणू काही निसर्ग या परिसरावर फिदा होता. खंडाळ्याचा घाटच होता तो.

नेहमी कंटाळवाणा वाटणारा हाच का तो रस्ता असा मनाला प्रश्न पडला. डोंगर चढून आम्ही परिसर न्याहाळू लागलो. निरनिराळी झाडवेली, निरनिराळ्या रंगांची, गंधाची फूले उमलली होती. मधुर, उग्र रान फुलांचा सुवास मनाला सुखावित होता. नुकत्याच पडलेल्या पावसाने तयार झालेले ओहळ, दरीतील खडकांवर आपटून फेसाळलेले दिसत होते. त्यांचा खळाळता आवाज कानाला सुखावित होता. निळे आभाळ इंद्रधनूच्या सप्तरंगी पट्टयाने रंगविले होते जणुकाही चित्रकार चित्रांचा पट्टा रंगवून नुकताच घरी गेला आहे. प्रत्येक घराच्या कौलांवर, पत्र्यांवर सूर्यास्ताची पिवळसर किरणे पडली होती त्यामुळे पत्र्यांचा रंग सोनेरी झाला होता. सूर्याभोवती लालबुंद वलय खुलून दिसत होते. ते किरण शेतांवर झाडांवर पडल्याने सर्व वृक्षराजी सोन्याने मढविल्याप्रमाणे दिसत होती. सर्वत्र उल्हासाचे आणि आल्हाददायक वातावरण होते. उन्हाने आलेली मरगळ निघून गेली होती. दूर दूर चालत गेला तरी थकवा जाणवत नव्हता. नंतर आम्ही सर्वानी थर्मासमधील चहा आणि बिस्किटांवर ताव मारला.

पाहता पाहता सूर्य डोंगरपल्याड गेला. सर्व पाखरे आपल्या पिलांच्या ओढीने घरट्याकडे परतत होती. सूर्यास्त झाला तरी त्याची प्रभा आणि आभास सगळ्या आकाशभर रेंगाळत होता. जणूकाही आपले अस्तित्व मिटवणे रविराजाला कठीण जात होते. उरलेल्या संधिप्रकाशात निळे डोंगर, टेकड्या आणखीच गडद दिसू लागल्या व एखाद्या तपस्वीप्रमाणे शांत, वैराण वाटू लागल्या. क्षणापूर्वी दिसणारा नयनरम्य निसर्ग काळोखाच्या आड लपला गेला. क्षितिजावरील भास्कराच्या पाऊलखूणा मनात साठवत आम्ही मागे फिरलो. दरीत गूढतेचा गहिरा रंग भरला गेला.

पक्षी आतापर्यंत आपल्या घरट्यात विसावले होते. त्यांची चिमणी बाळे पंखांच्या कुशीत गाढ निजली होती. काही चुकार पक्ष्यांचे थवे नभांत इकडे तिकडे भिरभिरत होते. पक्ष्यांच्या पांढऱ्या रंगांच्या थव्यांना पाहून मला बालकवींची कविता स्मरली.

‘बगळ्यांची माळ फुले ती अजुनी अंबरात’

इतक्यात गाडी दुरुस्त झाल्याची वर्दी आम्हास मिळाली. परंतु गाडीच्या नादुरुस्तीमुळे आम्हाला एका नयनरम्य संध्याकाळचे सुंदर दृश्य अवलोकन करता आले म्हणून गाडीचे व सुंदर निसर्ग दृश्य बनविणार्या देवाजीचे आम्ही मनोमन आभारच मानले.

‘सांध्यरंग रंगपंचमी आवरुन पश्चिमेच्या कुशीत शिरले तोच एक चिमुकली चांदणी माथ्यावरी चमकली’ सायंकाळच्या अविस्मरणीय देखाव्याचे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवत आम्ही पुण्याकडे परत प्रस्थान केले.

तुम्हाला हा रम्य सायंकाळ मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

हे नक्की वाचा :