[UPDATED] माझा वाढदिवस मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

माझा वाढदिवस

माझा वाढदिवस २५ मे रोजी असतो. दरवर्षी माझ्या कुटुंबातील सर्वजण माझा वाढदिवस आनंदाने आणि खेळीमेळीने साजरा करतात. या निमित्ताने माझे दोन्ही आजी-आजोबा, काका काकी, मामा-मामी आमच्या घरी येतात. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील बोलावले जाते. उन्हाळ्याची सुटी असल्याने सर्वजण अभ्यास व परीक्षेच्या तणावातून मुक्त असतात. जणूकाही आम्ही या दिवसाचीच वाट पाहत असतो. मला सर्वजण शुभेच्छापत्रे आणि छान छान पुस्तके, खेळणी भेट म्हणून देतात. माझी वाचनाची आवड पाहून विज्ञानाची, सामान्यज्ञानपर पुस्तकेही देतात. त्यामुळे पाठ्यपुस्तकांबरोबरच अनेक विषयावरील विविध पुस्तके माझ्या संग्रही जमा झाली आहेत. मला मोठेपणी पायलट बनायचे आहे. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारची आणि आकारांची विमाने, हेलिकॉप्टर्स माझ्या कपाटात आहेत. सर्वजण माझ्या या छंदाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात.

यावर्षी मी १२ वर्षाचा झाल्याने आई-बाबांनी माझा हा वाढदिवस अविस्मरणीय करण्याचे ठरवले. त्यामुळे सर्वजण माझ्या वाढदिवसाच्या तयारीला लागले. बाबांनी घराला माझ्या आवडीचा रंग दिला. घरावर विद्युत रोषणाई केली. बैठकीची खोली रंगीबेरंगी कागदांनी आणि फुग्यांनी सजवली. आईने माझ्या आवडीचे पदार्थ तयार केले. मी सकाळीच अनाथाश्रमात आई-बाबांबरोबर जाऊन तेथील मुलांना मिठाई, खेळणी व गोष्टीची पुस्तके भेट म्हणून देवून आलो.

संध्याकाळी मी मला आणलेले नवीन कपडे घातले. आईने मला कुंकुमतिलक लावून ओवाळले. मी मेणबत्या विझवून केक कापला. “हॅपी बर्थ डे” म्हणत टाळ्या वाजवून सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. सर्व मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करुन मी त्यांचे आशीर्वाद घेतले. माझ्या मित्रमैत्रीणीनी गाणी म्हटली. आलेल्या सर्वांना ती गाणी खूप आवडली. नंतर आम्ही विविध गेम्स खेळलो. जे जिंकले त्यांना बाबांनी बक्षिसे दिली. खूपच मजा आली.

नंतर आम्ही सर्वांनी आईने दिलेला फराळ, केक नि चॉकलेटस खाल्ले. कैरीचे थंडगार पन्हे पिऊन सर्वजण तृप्त झाले. माझा छायाचित्रणाचा छंद जाणून माझ्या मामांनी मला सुंदर कॅमेरा भेट म्हणून दिला तर पक्षीनिरीक्षणाच्या आवडीबद्दल काकांनी छानशी दुर्बिण दिली. हा असा आनंदाचा सोहळा व्हिडीओने चित्रित केल्याने अविस्मरणीय ठरला.

रात्री जेवणानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. सर्वजण गेल्यावर माझ्या आईने मीठ-मिरचीने माझी दृष्ट काढली. आईच्या कुशीत आरामात झोपी गेलो नि स्वप्नांच्या नगरीत पोहचलो.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment