[UPDATED] आमची कपिला गाय मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.

आमची कपिला गाय

आमची कपिला गाय मराठी निबंध

माझे गाव खेडे आहे. तिथे माझ्या आजोबांनी आणि काकांनी खूप गाई-म्हशी पाळल्या आहेत. त्यात चार म्हशी, एक बैलजोडी, दोन गाई नि दोन वासरे अशी मिळून आठ-दहा जनावरांचा बारदाना आहे. आमची कपिला गाय नुकतीच व्याली. तिने गोंडस अशा बछड्याला जन्म दिला. गाईच्या पिल्लाला वासरु असे म्हणतात. पिल्लू अगदी आपल्या आईप्रमाणे चॉकलेटी पांढऱ्या रंगाचे असून कपाळावर तीट लावल्याप्रमाणे ठिपका आहे. त्यामुळे ते पाडस खूपच छान दिसते.

कपिलाही लहानपणापासून आमच्याच घरात वाढलेली आहे त्यामुळे तिला आम्ही सर्वजण खूप लळा लावतो. मी ही लहानपणापासून तिच्याशी खेळतो पण तिने आम्हाला कधीही मारले, पाडले नाही, ना कोणाला शिंगाने मारले. अगदी गरीब गाय म्हणजे आमची कपिला होय. तिच्याविषयी सर्वांनाच प्रेम व माया वाटते. आपल्या ओळखीच्या माणसांना ती ओळखते व प्रेमाने चाटायला सुरूवात करते. रोज सकाळी ती इतर गुरांबरोबर गुराख्याच्या पाठी चरायला जाते. ती संध्याकाळी घरी परत येते. आल्याबरोबर आपल्या बछड्याला प्रेमाने चाटून काढते,गोंजारते, दूध पिऊ देते.

कपिला गाय कुणाच्याही शेतात घुसून त्यांचे नुकसान करत नाही. माझी देखील ती खूप आवडती आहे. मी तिच्या गोंडस वासराबरोबर खेळत असताना ती वात्सल्याने आमच्याकडे पहात राहते. मी तिला वेळेवर चारा-पाणी देतो. तिचे दूध खूप गोड आणि घट्ट आहे. ती दररोज सकाळ -संध्याकाळ चार-पाच लिटर दूध देते.

मी तिच्या दूधावरच धष्टपुष्ट झालो आहे. तिचा बछडा तरी सहा महिन्यातच अंगापिंडाने भरला आहे. तो गाईला सारख्या दूशा मारून त्रास देत असतो पण ती त्याला प्रेमाने गोंजारत रहाते.

एके सकाळी गुराख्याबरोबर गेलेली कपिला संध्याकाळ उलटून रात्र झाली तरी घरी परतली नाही. आम्ही सर्वजण काळजीत पडलो होतो. गुराख्याला धारेवर धरले पण तो एकच पालुपद सांगत होता, संध्याकाळपर्यंत कपिला त्याच्याजवळच चरत होती नंतर नजर चुकवून कुठे गायब झाली ते कोण जाणे. पण आमची कपिला आम्हाला दुरावली होती. तिचे वासरू तर हंबरून थकले होते. आता काय करायचे या विवंचनेत आम्ही पडलो असताना आमच्या कानी ओळखीचे हंबरणे आले. बाहेर येऊन पाहतो तर कपिला काकुळतीने पिलाला चाटत होती व तिचा कासरा पकडून एक पोलीस उभा होता.

पोलिसानेच सांगितले की एक भामटा या गाईला कासऱ्याला धरून खेचत रस्त्याने चालला होता. कपिला हंबरून दाव्याला हिसका मारत होती. पोलिसाला शंका आली म्हणून त्यांनी भामट्याला हटकले तर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीबद्दल कबुली दिली. दावे सोडून आम्ही तिच्या पाठीमागे येताच ती इथे येऊन हंबरू लागली. 

क्रुरते पुढे ममतेने विजय मिळवला होता. आपल्या वासराला सोडून एक आई थोडा वेळ ही लांब राहू शकली नाही. तो कसाई मात्र खडी फोडायला तुरूंगात गेला होता जो तिला नेऊन ठार मारणार होता. 

अशी ही गुणी कपिला आता आमची फारच लाडकी झाली. आईनेही तिला हिरवागार चारा व पाणी प्यायला दिले. तिची दृष्ट काढली आज तिने एका अपराध्याला पकडून दिले होते.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Leave a comment