[2024] प्रधानमंत्री पीक विमा योजना संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Fasal Bima Yojana | Crop Insurance scheme

Pradhan Mantri Fasal Bima Yojana: नमस्कार मित्रांनो, आजकाल कुठलीही गोष्ट शाश्वत राहिलेली नाही .आयुष्य क्षणभंगुर होतेच. मात्र आता कुठल्याही गोष्टीचा भरवसा राहिलेला नाही.भारत हा एक कृषिप्रधान देश आहे .बऱ्याच लोकांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून असते. त्यामध्ये महाराष्ट्र हे एक अग्रगण्य राज्य आहे. पाहायला गेलो तर देशातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत .

बरेच शेतकरी हे स्वतःचे आयुष्य दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत. पूर्वी निसर्ग हा योग्य रीतीने चालत असे. त्यावेळी शेती उत्पादन हे कमी मात्र कसदार आणि शाश्वत असे .त्यावेळी योग्य प्रमाणात असणाऱ्या लोकसंख्येमुळे निसर्गाचा जास्त प्रमाणात उपभोग घेण्याची वृत्ती नव्हती. परिणामी सर्वकाही अलबेल असे .केव्हा केव्हा  तप दोन तपातून एखाद्या वेळी छोटा मोठा दुष्काळ पडेल.

काही दुष्काळ तीव्रही असत. मात्र इतर वेळी किमान उत्पादन खर्च भागणे इतके उत्पादन तरी निश्चितच होत असे. मात्र आजकाल अवकाळी पाऊस तसेच विविध रोगांचा अति प्रमाणात होणारा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मर्यादा आणतो. शेतकरी दरवर्षी आशेने शेतीमध्ये विविध पिके पेरतो. त्यासाठी तो खतांचा वापर आणि फवारणी सुद्धा करतो.

परंतु सतत वाढणाऱ्या महागाईमुळे शेतकऱ्याला बियाणे खत व कीटकनाशके खरेदी करणे शक्य होत नाही. त्यासाठी तो बँक किंवा वित्त संस्था यांच्याकडून जास्त व्याजदराने कर्ज घेऊन शेती करतो. मात्र सलग दोन-तीन हंगाम तोट्यात गेल्यास शेतकरी ही हवालदिल होतो.

दुष्काळ ,अतिवृष्टी,चक्रीवादळ, वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा अति प्रमाणात होणारा प्रादुर्भाव अशा अनेक प्रकारची आव्हाने शेती पुढे निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे.

अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे .काही शेतकरी हे आपले कर्ज फेडू न शकल्यामुळे स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतात.

या सर्व गोष्टींचा विचार करून व संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अशा वेळेस मोलाची साथ देण्याची भूमिका पिक विमा बजावते .पिक विमा म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास आपल्याला मिळणारी नुकसान भरपाई होईल.

मात्र यासाठी आपल्याला काही आगाव रक्कम देखील भरावी लागते. तर शेतकरी बांधवांनो पीक विम्याची संपूर्ण माहिती,पीक विम्याची मुदत,भरावी लागणारी रक्कम,मिळणारा परतावा, तसेच अन्य इतर बाबी याविषयी आपण आजच्या लेखांमध्ये माहिती बघणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात शेतकरी बंधूंच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या विषयाबाबत अर्थातच पिकविम्याबाबत……

पिक विमा म्हणजे काय? What is Crop Insurance?

ज्याप्रमाणे आपण जीवन विमा किंवा वाहन विमा काढतो म्हणजेच आपल्या वाहनाचे नुकसान झाले तर,वाहनाचे झालेले नुकसान हे विमा कंपनी भरून काढते. त्याचप्रमाणे

पिक विमा म्हणजे गारपीट, वादळ ,जोराचा पाऊस, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई म्हणून ठरलेल्या धोरणानुसार दिल्या जाणाऱ्या रकमेला विमा असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

पिक विमा योजनेची सुरुवात राजीव गांधी हे पंतप्रधान असताना केंद्र शासनाने देशातील पहिली एकात्मिक पिक विमा योजना इसवी सन 1985 साली सुरू केली. त्यानंतर इसवी सन 1999 साली एन.डी.ए. या सरकारने एक देश एक योजना ही “राष्ट्रीय कृषी विमा योजना”(National Agricultural Insurance Scheme) लागू केली. परंतु ही योजना चालू केली तेव्हा या योजनेत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता. 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने या पिक विमा योजनेत काही बदल घडून आणले व या बदलांसह ही योजना चालू ठेवली.

देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोबदला वाढवणे याच उद्देशाने 13 जानेवारी 2016 ला नरेंद्र मोदी सरकारने ‘पंतप्रधान पिक विमा योजना’ (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) ही लागू केली होती जेणेकरून शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळून त्यांना आर्थिक सहाय्य मिळून तसेच ,शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करण्याच्या दृष्टीने, आणि तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी, शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी ही योजना राबविण्यात आली होती.

पिक विमा योजनेची उद्दिष्टे नैसर्गिक आपत्ती ,वातावरणातील बदलामुळे पिकांना लागलेली कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा प्रमुख उद्देश आहे. ही योजना  सुरू करण्याचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत व्हावी हा आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. शेतकऱ्यांना नवीन व आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करून पीक पद्धतीमध्ये बदल होइल व कृषी क्षेत्रात स्पर्धात्मक स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राहील व प्रत्येक शेतकरी हा शेतीमध्ये टिकून राहील.

शेतकऱ्याचे जर नुकसान झाल्यावर शेतकरी हा आत्महत्या करून आपले जीवन संपवतो त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे .प्रत्येक शेतकऱ्याला स्वावलंबी बनवणे.

पी.एम. विमा योजना चे फायदे

पिक विमा योजना ही शेतकऱ्यांना नवसंजीवन देणारी योजना आहे.

या योजनेचा फायदा कर्जदार , बिगर कर्जदार शेतकरी तसेच बटाईने शेती करणारा आशा सर्व प्रकारचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अनुसूचित जाती ,जमाती व महिला हे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत फक्त विम्याची 2% रक्कम शेतकऱ्याला भरायची असते .बाकीची रक्कम ही राज्य सरकार व केंद्र सरकार भरत असते. खरीप पिकांसाठी 2% रक्कम व रब्बी पिकासाठी 1.5 % असा हप्ता भरावा लागतो. तसेच बागायती पिकांसाठी भरावा लागणारा हप्ता हा 5% असतो.

म्हणजेच शेतकऱ्यांना भरावा लागणारा लागणारा हप्ता हा खूपच कमी आहे.

या योजनेअंतर्गत 90% पेक्षा जास्त भार हा शासनाकडून उचलला जाईल.

प्रधानमंत्री पिक विमा योजना यासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन करण्यात आलेली आहे .ज्यामुळे शेतकरी आपल्या मोबाईलच्या साह्याने सुद्धा या योजनेचा अर्ज करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ व पैसे या दोघांचीही बचत होईल.  या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा होते.

पिक विमा योजना लाभार्थी

 देशातील सर्व शेतकरी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कर्जदार ,बिगर कर्जदार तसेच कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पिक विमा योजनेअंतर्गत आवश्यक असणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशनिंग कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • 7/12 उतारा
  • बँक खाते
  • शेतात पिकांची पेरणी झाली असेल तर त्याचा पुरावा त्यासाठी शेतकऱ्याला तलाठी ,सरपंच, ग्रामसेवक यांचे पत्र सादर करावे लागते.
  • स्वयंघोषणापत्र
  • बँकेचा रद्द केलेला चेक

विमा संरक्षण मिळण्यासाठी काही अटी ठरवून दिलेल्या आहेत

पीक पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ ,चक्रीवादळ, पूर, भूत्खलन, दुष्काळ ,कीड व रोग इत्यादी बाबींमुळे जर पिकांचे नुकसान झाले तर आपल्याला नुकसान भरपाई मिळते. परंतु त्यासाठी काही अटी सरकारने ठेवलेल्या आहेत.

या योजनेचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर पिक पेरल्यानंतर 10 दिवसांच्या आत आपल्याला फॉर्म भरावा लागेल.

पीक काढणीच्या 14 दिवस अगोदर जर तुमचे काही कारणाने नुकसान झाले तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच पूर ,दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई देण्यात येते. तसेच पीक कापणी नंतर किंवा काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरून ठेवले असेल व त्यावेळेस जर चक्रीवादळ किंवा अवेळी पाऊस यामुळे अधिसूचित पिकांचे नुकसान झाले तर वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल.

परंतु त्यासाठी सदरचे नुकसान काढणी व कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाई पात्र राहील. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्याचे वैयक्तिकरित्या नुकसान झाले तर सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे .

त्या वित्तीय संस्थेत किंवा संबंधित विमा कंपनीत कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून 48 तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकांची माहिती व नुकसानीचे कारण कळवणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच पूर ,भूत्खनन, गारपीट यामुळे विमा संरक्षित क्षेत्राचे नुकसान झाले तर वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल.

मानवनिर्मित आपत्ती उदाहरणार्थ आग लागणे, चोरी होणे इत्यादी बाबींसाठी ही योजना समाविष्ट नाही.

सदर विमा संरक्षण हे विमा अधिसूचित क्षेत्रातील मुख्य पिकांना लागू राहील. विमा अधिसूचित क्षेत्रावर मुख्य पीक निश्चित करताना जिल्हा किंवा तालुकास्तरावरील एकूण पिकाखालील क्षेत्रांपैकी किमान 25 टक्के पेरणी क्षेत्र हे हंगामातील त्या मुख्य पिकाखाली असणे आवश्यक आहे. शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतरच विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई अदा करण्यात येईल.

 या योजने अंतर्गत पिकाची नुकसान भरपाई झाल्यानंतर सदर पिकासाठी घेण्यात आलेला विमा संरक्षण संपुष्टात येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकसान झाले तरच  विम्याची रक्कम आपल्याला मिळते. जर आपण विमा काढला व आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही तर आपल्याला विम्याची रक्कम मिळत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले नुकसान झाले तर 72 तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी, संबंधित बँक ,कृषी महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक या द्वारे द्यावी.

पिक विमा क्लेम कसा करायचा? How to claim Crop Insurance?

पिक विमा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो.

ऑनलाइन पद्धत प्रक्रिया

1.पिक विमा क्लेम ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे लागेल.

 2.आता हे क्रॉप इन्शुरन्स नावाचे एप्लीकेशन ओपन करा .तेथे तुम्हाला रजिस्टर एस फार्मर, लॉगिन फॉर पॉलिसीज, कंटिन्यू विदाऊट लोगिन, चेंज लैंग्वेज असे चार पर्याय दिसतील. त्यापैकी तुम्ही कंटिन्यू विदाऊट लोगिन या पर्यायावर क्लिक करा.

 3.आता तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी क्रॉप लॉस या पर्यायावर क्लिक करा.

4. नंतर तुम्हाला परत दोन पर्याय आहेत त्यापैकी क्रॉप लॉस इंटीमेशन हा पर्याय क्लिक करा.

5.आता तुमचा मोबाईल नंबर ॲड करा आणि सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.

 6.आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल व तो ओटीपी प्रविष्ट करा .

7. आता तुम्हाला खाली दिल्या प्रमाणे माहिती प्रविष्ट करायची आहे.

सीजन यामध्ये तुम्हाला तुम्ही ज्या सीझन मधील पिकाचा पिक विमा काढला आहे ते निवडा. जसे की रब्बी किंवा खरीप.

त्यानंतर आपल्याला वर्ष निवडायचे आहे 2022

 प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही स्कीम निवडायची आहे.

आपले राज्य महाराष्ट्र निवडायचे आहे .

8. आता आपल्यासमोर बँक, सी एससी फार्मर ऑनलाईन, इंटरमिडीएरी हे पर्याय दिसतील. त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी पिक विमा हा सीएससी मधून अप्लाय केला असल्यामुळे या ठिकाणी सीएससी निवडून घ्यावा जर तुमचा पिक विमा हा बँकेने भरला असेल तर बँक हा पर्याय निवडून घ्यावा.

9. त्यानंतर डू यू हॅव पॉलिसी नंबर ? मध्ये तुमचा पिक विमा पावतीवरील पॉलिसी नंबर टाकावा आणि डन या पर्यायावर क्लिक करावे.

10. आता तुमच्यासमोर शेतकऱ्याची डिटेल ओपन होईल.

11.त्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये तुमचे किती नुकसान झाले आहे ते ऍड करायचे आणि इतर आवश्यक माहिती भरायची त्यानंतर नुकसान झालेल्या पिकांचा फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करून डन करायचे आहे.

12.आता आपल्या समोर आपला पिक विमा क्लेम हा झालेला आहे असे दिसेल. क्रॉप लॉस रिपोर्ट सक्सेसफुली असे आल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर एक डॉकेट आयडी आलेला असेल त्याचा स्क्रीन शॉट काढून घ्या व जपून ठेवा.

पिक विमा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील कंपन्यांमार्फत फॉर्म भरू शकतो

कृषी विमा कंपनी

– चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी

– रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

– बजाज अलियान्झ

फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

– एचडीएफसी एर्गो (HDFC ERGO) जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

– इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

– युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी

आयसीआयसीआय (ICICI) लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

– टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

– एसबीआय (SBI) जनरल इन्शुरन्स

– युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी

मी दिलेल्या या माहितीचा आपल्या शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. आपण मी दिलेल्या या माहितीचा नक्कीच उपयोग करून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा फॉर्म भरून जरूर फायदा घ्यावा. धन्यवाद!!!!

Source : https://pmfby.gov.in/

Leave a Comment