संत तुकाराम महाराज माहिती | Sant tukaram maharaj information in marathi

संत तुकाराम महाराज माहिती | Sant tukaram maharaj information in marathi

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें

पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास

नाही गुण दोष अंगा येत ।।

या अभंगाच्या ओवी कानावर पडल्या की, आपल्याला संत कवी तुकाराम महाराज यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

त्यांनी केलेल्या अभंगांना खूप लोकप्रियता मिळालेली आहे.

जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही की ,ज्याला संत तुकाराम व त्यांचे अभंग माहित नाही.

आजच्या काळात सुद्धा तुकारामांचे अभंग हे ऐकले जातात व त्यांची लोकप्रियता अजूनही जशीच्या तशीच आहे.

संत तुकारामांच्या अभंगांचा अभ्यास आजही सर्व वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक करत आहेत.

वारकरी संप्रदाय हा तुकाराम महाराजांना “जगद्गुरु” म्हणून ओळखतात.तसेच आपल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी ते “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ,पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ! असा जयघोष करत असतात.

लहानपणापासूनच संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाची अनामिक अशी ओढ होती. त्यामुळे त्यांना जळी, स्थळी ,काष्टी, पाशाणी फक्त पांडुरंग आणि पांडुरंगच दिसे. अशा थोर संत तुकाराम महाराजांबद्दल आपण आज माहिती पाहूयात!!!

Sant tukaram maharaj information in marathi – संत तुकाराम महाराज माहिती

आपल्या अभंगाने इंद्रायणी तीर भक्तिमय करणारे व अवघ्या महाराष्ट्राला विठ्ठल भक्तीत लीन करून घेणारे तुकाराम महाराज हे सतराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेले. इंद्रायणी काठी असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्र अशा देहू या गावी आंबिले कुटुंबात 22 जानेवारी 1608 मध्ये अर्थातच वसंत पंचमी – माघ शुद्ध पंचमीला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला.

परंतु तुकारामांच्या जन्म वर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.त्यांच्या  वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले आणि आईचे नाव कनकाई होते. तुकाराम महाराजांना दोन भाऊ होते. थोरल्या भावाचे नाव सावजी होते. तर धाकटा भाऊ हा कानोबा होता.

संत तुकाराम यांची पहिली पत्नी रुक्मिणी ही होती. तुकाराम महाराजांची पहिली पत्नी हिचे दम्यामुळे अकाली मृत्यू झाला. तिचा पहिला मुलगा सुद्धा अकाली मृत्यू पावला. या दुःखाने तुकाराम महाराज खूप दुःखी झाले होते .त्यानंतर तुकाराम महाराज यांचे दुसरे लग्न पुणे जिल्ह्यातील खेडच्या आप्पाजी गुळवे यांच्या मुलीशी झाले. तिचे नाव जिजाई असे होते. तिला अवलाई असेही म्हणायचे. जिजाईपासून संत तुकारामांना महादेव ,विठोबा, नारायण,काशी, भागीरथी, गंगा अशी सहा मुले झाली.

संत तुकाराम महाराजांची कथा

संत तुकाराम महाराजांना विठ्ठल भक्तीचा वारसा हा त्यांच्या पूर्वजांकडून प्राप्त झाला होता. संत तुकाराम महाराजांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत हे पंढरपूरचा विठ्ठल व रुक्मिणी हे होय. तुकाराम महाराजांच्या मनाची अवस्था अशी होती की, त्यांना प्रत्येक ठिकाणी फक्त पांडुरंग दिसायचा. त्यांच्या ध्यानीमनी फक्त पांडुरंग वसलेला होता.त्यांचे पूर्ण कुटुंब हे विठ्ठल भक्तीत रंगलेले होते. त्यांचे वडील स्वतः बोल्होबा हे खूप मोठे विठ्ठल भक्त होते.

त्यांनी आपले पूर्ण आयुष्य हे विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय, हरिनाम, व साधू संतांची सेवा यामध्ये वाहून घेतले होते. त्यामुळे वडिलांकडून हीच शिकवण संत तुकाराम महाराजांना मिळाली.दर महिन्याच्या पंढरपूरच्या वारीला जायचे तिथे विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे.चंद्रभागेत स्नान करायचे व नगर प्रदक्षिणा घालायची. हेच संस्कार त्यांच्या मुलांना दिले. अशा संस्कारांमुळेच लहानपणापासूनच या तीनही भावंडांना विठ्ठल भक्तीचे वेड लागलेले होते. संत तुकाराम महाराज हे लहानपणी खूप खेळकर वृत्तीचे होते.

ते आपल्या भावंडांसोबत नदी काठावर जायचे. पाण्यात मस्ती करणे, आपल्या वयाच्या मुलांसोबत पाण्यात पोहणे, आजूबाजूला असलेल्या वडपिंपळाच्या मोठ्या झाडांवर झोके घेणे. हे त्यांचे आवडते खेळ होते. संत तुकाराम महाराजांना लहानपणापासूनच वृक्ष ,झाड, वेली व आजूबाजूच्या हिरवळीवर अतोनात प्रेम होते. हे सर्व आपल्याला पांडुरंगाचे देणे आहे असे ते मानत असत. त्यामुळेच त्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी” हा अभंग रचलेला आहे.

संत तुकाराम महाराजांचे जीवन

तुकाराम महाराजांच्या वडिलांचा सावकारीचा असा परंपरागत व्यवसाय होता. तसेच त्यांच्याकडे शेती व गुरेढोरे सुद्धा होती. तुकाराम महाराजांचे बालपण हे अगदी सुखात गेले. तुकाराम महाराज हे किशोरवयीन असतानाच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी पडली.

तुकाराम महाराजांचा परंपरागत व्यवसाय हा सावकारीचा असला तरीही त्यांना सावकारी कशी करायची, पैसा कसा कमवायचा, वडिलांचा व्यवसाय पुढे कसा न्यायचा याची काहीच कल्पना नव्हती. संत तुकाराम महाराजांना ऐश्वर्याचा, पैशामध्ये काडी मात्र ही रस नव्हता. कारण, त्यांना असे वाटते असे की, जर आपण हा पैसा साठवून ठेवला तर लोकांचा हा तळतळाट घेऊन कमावलेला  पैसा आपल्याला देवापर्यंत कधीच पोहोचू देणार नाही.

त्याच वर्षी भयंकर दुष्काळ पडला. त्या दुष्काळामुळे सर्व लोक ग्रासले होते. त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी एक वेगळाच आदर्श लोकांसमोर ठेवला. त्यांनी आपली सारी संपत्ती गावातली लोकांमध्ये वाटून दिली.

लोकांना सावकारीच्या पैशातून मुक्त केले. त्यांच्याजवळ जी जमिनीची गहाण ठेवलेले कागदपत्रे होती. ती इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली व सर्व गावातील लोकांना कर्ज माफ केले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा जगातील पहिला संत म्हणजे संत तुकाराम महाराज होय. अशी तुकाराम महाराज यांची ख्याती ही संपूर्ण जगामध्ये नावलौकिक झाली. यातूनच तुकाराम महाराजांना “तुका हा आकाशाएवढा” अशी उपाधी दिली गेली.त्यासंदर्भात अशी काव्यरचना आहे की, “अनुरेनीय थोकडा, तुका आकाशाएवढा.”

संत तुकाराम महाराजांचे कार्य

संत तुकाराम महाराजांचे वडील गेल्यानंतर त्यांचे पुढील आयुष्य हे खूप खडतर व दुःख भोगणारे होते. पुढे आयुष्यात एवढे दुःख सहन करत असताना सुद्धा त्यांनी विठ्ठलाची भक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी केली नाही. त्यांनी त्यांची भक्ती ही चालूच ठेवली. संत तुकाराम महाराज हे बुद्धिवादी होते.परंतु त्यांच्यात एक कवी लपलेला होता.त्यांनी अभंग रचण्यास सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांनी देहू गावाजवळ असलेल्या भंडारा नावाच्या डोंगरावर आपली उपासना चालूच ठेवली. त्या डोंगरावर झाडाखाली बसून ते आपले कीर्तन व अभंग गात असत.

त्यांचे स्वतःचे असे विठ्ठलाचे मंदिर होते. त्या मंदिराची पडझड झालेली होती. त्यांनी ते मंदिर दुरुस्त केले व त्या ठिकाणी ते कीर्तन करू लागले. स्वतःचे अभंग गाऊ लागले .त्यांनी आपल्या प्रवचनातून पोथीनिष्ठ पाठांतरवादी कर्मठ लोकांवर टीका केली. त्यांनी आपल्या प्रवचनातून व कीर्तनातून वेदांचा उल्लेख हा लोकांना लोकभाषेत सांगितला. त्यामुळे ब्राह्मण समाजाला ते आवडले नाही.

अशा समाजातील विकृत विकाराच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्यासाठी  कटकारस्थाने केली परंतु त्यातूनही तुकाराम महाराज सुटले.

संत तुकाराम महाराजांची कीर्ती ही दाही दिशांना वाऱ्यासारखी पसरली. ही कीर्ती छत्रपती शिवरायांच्या ही कानी गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना द्रव्य आणि पोशाख यांचा नजराणा पाठवला. परंतु त्यांनी हे सोने मला माती समान आहे. या सोन्याची मला आवश्यकता नाही.

याचा उपयोग तुम्ही गोरगरिबांच्या कल्याणासाठी करा असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तरामुळे शिवाजी महाराजांच्या मनात त्यांचा आदर अधिकच वाढला . त्यामुळे शिवाजी महाराज त्यांच्या भेटीसाठी व्याकुळ झाले. रयतेचा राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांना आपले गुरु मानत होते. संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. संत तुकाराम महाराजांनी नेहमी स्वतःच्या सुखापेक्षा जगाच्या कल्याणाकडे सदैव लक्ष दिले.

त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये ईश्वर भक्तीचे बीज रोवले. सतराव्या शतकामध्ये प्रबोधन करणारे व समाज सुधारक अशी ख्याती निर्माण झाली. त्यांनी आपल्या प्रबोधनातून समाजाचे हित घडवण्याचे एक महत्त्वपूर्ण काम केले. समाजातील अंधश्रद्धा, समाजातील रूढी परंपरा, वाईट प्रथा दूर करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगासोबत काही गवळणीही रचलेल्या आहेत. अजूनही सामान्य माणसांच्या मुखात विठ्ठलाचे ध्यान करताना हे अभंग व काव्यरचना कायम आहेत.

संत तुकाराम महाराजांविषयी च्या आख्यायिका

संत तुकाराम महाराजांबद्दल अशी आख्यायिका आहे की,संत तुकाराम महाराज हे संत शिरोमणी नामदेवांचा अवतार आहेत. संत नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता. तेव्हा त्यांच्या घरातील 14 माणसे ही रात्रंदिवस अभंग लिहायला बसले होते.तेव्हा  स्वतः त्यांची  मदत करण्यासाठी पांडुरंग ही अभंग लिहायला बसले होते.९६  कोटी अभंग लिहून पूर्ण झाले. पण ४ कोटी अभंग हे अपुरेच राहिले. तेव्हा असे मानले जाते की, ते ४ कोटी अभंग पूर्ण करण्यासाठी नामदेव यांनी  पृथ्वीतलावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अवतारात जन्म घेतला.

संत तुकाराम महाराज हे संस्कृत मधील अवघड श्लोक व अभंग हे सामान्य लोकांना समजत नाही म्हणून मराठीतून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये विठ्ठलाच्या भक्तीचे बीज रोवले गेले. परंतु पुण्याजवळील वाघोली येथे राहणारे रहिवासी रामेश्वर भट यांना हे आवडले नाही.

त्यामुळे त्यांनी तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा ही इंद्रायणीत बुडवण्याची शिक्षा संत तुकारामांना दिली. ते पाहून सर्व लोक हळहळ व्यक्त करत होते. त्यावेळी हे दृश्य पाहण्यासाठी इंद्रायणी नदीच्या काठी भरपूर प्रमाणात लोकांचा जनसमुदाय लोटला होता. संत तुकारामांनी आपल्या अभंग गाथा या इंद्रायणी नदीत सोडल्या. त्यावेळेस लोकांनी इंद्राणीच्या काठीच एकाच सुरात गाथेतील अभंग म्हणायला सुरुवात केली.

हे पाहून संत तुकाराम महाराज इतके भारावून गेले की, त्यांना जाणीव झाली  की आपले अभंग गाथा जरी इंद्रायणी नदीत बुडाली असली तरी जनमाणसांमध्ये ती एवढी रुजलेली आहेत की ती कधीच बुडाली जाणार नाहीत व विसरली देखील जाणार नाहीत. आपल्या अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर संत तुकाराम महाराजांना खूप दुःख झाले. ते रडू लागले. ते १३ दिवस इंद्रायणीच्या काठी अन्न, पाणी न घेता बसून होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची अवस्था पाहून स्वतः विठ्ठलाने त्यांना साक्षात्कार देऊन त्यांची इंद्रायणी नदीत बुडालेली अभंगाची गाथा त्यांना परत दिली. हे पाहून रामेश्वर भटांना आपल्या चुकीची जाणीव झाली व त्यांनी संत तुकाराम महाराजांची आरती देखील लिहिली आहे.

संत तुकाराम महाराजांचा वैकुंठवास

फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच ९ मार्च १६५० हा दिवस आपण “तुकाराम बीज” म्हणून साजरा करतो. याच दिवशी संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठ गमन झाले असल्याचे मानले जाते.

जेव्हा संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा “आम्ही जातो आमच्या गावा ,आमचा राम राम घ्यावा.” असे गाऊ लागताच समोर जमलेले शेकडो भक्तजण पांडुरंग हरीच्या तालावर नाचू लागले.

या दिवशी बरोबर १२.०२ वाजता तुकाराम महाराज  वैकुंठाला गेले.दर वर्षी तुकाराम बीज या दिवशी बरोबर त्याच वेळेस हे नंदुकीचे झाड प्रत्यक्ष हलते असे सांगितले जाते. हे पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत असतात.

तुकाराम महाराजांच्या जीवनपटावर अनेक पुस्तके, मालिका व चित्रपट प्रसिद्ध झालेले असून त्या माध्यमाद्वारे तुमाराम महाराजांची माहिती व अभंग लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. आजही मराठी भाषेत अनेक म्हणी वाक्प्रचार व शब्दप्रयोग हे तुकारामांच्या अभंगातूनच घेतलेले आहेत. आजही वारकरी देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी जातात व तुकारामांची अभंग गाथा डोक्यावर घेऊन अक्षरशा नाचत असतात.

 “ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस”.

धन्यवाद!!

Leave a Comment