झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो.
तर आज आपण बघूया झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध. मित्रांनो झाशीची राणी लक्ष्मी बाई व त्यांचे पराक्रम तर सर्वांना माहितीच असतील. आपल्या बाळाला पाठीशी बांधून युद्ध करणाऱ्या या थोर स्त्री बद्दल आपण आज माहिती बघणार आहोत.
झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध
मैं मेरी झाशी नही दूँगी
असे धीरोदात्त उद्गार होते शूर लढवय्या झाशीच्या राणीचे. राणी लक्ष्मीबाईच्या बहादूरीवर आजही आपण नतमस्तक होतो. सन १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी लक्ष्मीबाई ही वाईचे मोरोपंत तांबे यांची कन्या. मनू तिचं लाडकं नाव. तिची आई ती लहान असतानाच देवाघरी गेली. ब्रम्हावर्तास राहणारे दूसरे बाजीराव पेशवे यांचे आश्रित म्हणून मोरोपंत त्यांच्याजवळ राहत असताना पेशव्यांच्या कुटुंबातल्या मुलांसंगे मनूही घोड्यावर बसणे, तलवार चालविणे वगैरे मर्दानी कला शिकली. पुढे तिचा विवाह झाशी संस्थानचे विधूर राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला आणि तांब्यांची मनू झाशीची राणी ‘लक्ष्मीबाई’ झाली.
पुढे राणी लक्ष्मीबाईला मुलगा झाला पण तो अल्पायू ठरला. गंगाधररावही आजारी पडले. गादीला वारस म्हणून त्यांनी आपल्या घराण्यातल्या जवळच्या आनंदराव नावाच्या एका लहान मुलास दत्तक घेतले. त्याचे नाव ‘दामोदर’ असे ठेवले. पण दत्तकविधानाच्या दुसऱ्या दिवशीच गंगाधरपंत वारले. या काळात भारतात ब्रिटिशांचे राज्य होते. थोड्याच दिवसांत गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने ते दत्तकविधान नामंजूर केले. पुढे झाशीचे राज्य खालसा करून राणीला मासिक ५००० रू. पेन्शन देण्यात येणार असल्याचे कळवले.
डलहौसीचा पेन्शनबाबतचा खलिता वाचून तिने “मेरी झाशी नही दूंगी” अशी गर्जना केली. पण नाइलाज होऊन राणीला आपले राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यावाचून गत्यंतर उरले नाही. आतल्या आत चरफडत राणी गप्प बसली. १८५७ साली जेव्हा स्वातंत्र्य संग्रामाचा वणवा पेटला तेव्हा राणीने झाशी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. ही बातमी कळताच इंग्रज अधिकारी फार चिडले. त्या वेळचा शूर इंग्रज सेनानी सर ह्यू रोज झाशीवर चालून गेला. राणीने सतत अकरा दिवस अविश्रांत किल्ला लढवला पण फितुरीने दगा दिला. दगाफटका झाल्याने पुत्र दामोदर याला पाठीशी बांधुन मोजक्या सैन्यांसह शत्रुसैन्याचा वेढा भेदून राणीने नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे असलेल्या काल्पी किल्ल्याकडे कूच केले.
काल्पी येथे पेशव्यांच्या बेशिस्त सैन्याचा यू रोजने पराभव केल्याचे पाहून ती ग्वाल्हेरला गेली. ग्वाल्हेरच्या शिंदयांचा पराभव होऊन ते राज्य पेशव्यांच्या ताब्यात आले. राणीचा पाठलाग करत शत्रू इथेही पोहोचला.तशातच हयू रोज आणि त्याच्या सैन्याने ग्वाल्हेरवर हल्ला केला. अटीतटीच्या संग्रामात राणीने निकराने पराक्रमाची शर्थ केली. निवडक सहकारी आणि पाठीला बांधलेला दामोदर यांच्यासह ती निसटून जाऊ लागली. सर ह्यू रोजचे सैनिक तिथेही पाठलागावर होतेच. एका ओढ्याच्या काठी राणीचा घोडा थबकल्याची संधी साधून एकाने तिच्यावर तलवारीचा घाव केला. यातच राणीचा अंत झाला. अशा प्रकारे अवघे तेवीस वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरांगनेची वीरगाथा संपली.
तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
हे पण वाचा :